रत्नागिरी : संगमेश्वर पंचायत समितीच्या कृषी विभागातील लाखो रुपये वेळीच न भरल्याने दोन विस्तार अधिकाऱ्यांची एक वेतनवाढ थांबविण्यात यावी, असा आदेश जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली. सौर कंदिल, शेतीसाठी लागणारी औजारे ५० टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिली जातात. ही साधनसामुग्री शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची ५० टक्के रक्कम पंचायत समितीमध्ये जमा केली होती. १८ लाख ३६ हजार एवढी ही रक्कम रोख स्वरुपात पंचायत समितीकडे होती. संगमेश्वर पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक घोटाळा केल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाच्या एका मासिकासाठी शेकडो शेतकऱ्यांकडून हजारो रुपये गोळा करण्यात आले होते. ही रक्कम अधिकाऱ्यांनी मासिकाकडे वेळीच जमा करणे आवश्यक होते. मात्र, सुमारे ४०० शेतकऱ्यांकडून ६० हजार रुपये एवढी रक्कम गोळा करण्यात आली होती. ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी न भरल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी उपाध्यक्ष शेवडे यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी आजच्या कृषी समितीच्या सभेत संगमेश्वर पंचायत समितीच्या कृषी विभागातील विस्तार अधिकारी राजेंद्र कणसे आणि पवार यांनी शेतकऱ्यांनी दिलेले पैसे वेळीच शासकीय तिजोरीत न भरल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश उपाध्यक्ष शेवडे यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले़ या सभेला रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रकाश साळवी, संगमेश्वरचे सभापती गुरव व अन्य सदस्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)कृषी विभागातील लाखो रुपये वेळीच न भरल्याने कारवाई.संगमेश्वर पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक घोटाळा केल्याचे पुढे.शेतकरी या मासिकासाठी गोळा केलेली हजारोंची रक्कम भरली नसल्याचा आरोप.कृषी समितीच्या सभेत घोटाळ्याबाबत चर्चा.शासकीय तिजोरीत पैसे न भरल्याने कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश.
दोन विस्तार अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणार
By admin | Updated: January 14, 2015 23:18 IST