अनिल कासारे / लांजा : काेराेनाची संख्या झपाट्याने वाढत असून, शहराबराेबरच ग्रामीण भागातही काेराेनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, आजही अनेक गावांनी नियमांचे याेग्य पालन करत काेराेनापासून गावाला दूर ठेवले आहे. लांजा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींना कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश आले आहे.
गेल्यावर्षी साधारण एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत दिनांक १७ डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झिरोवर आणण्यात यश मिळवले होते. तालुका कोरोनामुक्त होतो न होताे तोच दुसऱ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळले. मार्च महिन्याच्या अखेरीस व एप्रिल महिन्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मंगळवारपासून शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच याची मदत होऊ शकते, अशी आशा आहे.
मार्च २०२०मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. कोरोनाचा सामना करण्यासाठी तालुक्यातील ६० ग्रामपंचायती व त्या-त्या गावातील ग्रामस्थांनी उपाययोजना केली होती. मुंबई, पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला असल्याने याचा प्रादुर्भाव स्थानिक नागरिकांनाही होऊन हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. तरीही तालुक्यातील ६० पैकी १२ गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतींनी कोरोनाचे संकट आपल्या गावच्या वेशीवरच रोखण्यात यश मिळवले आहे. गेल्या वर्षभरात आपल्या गावामध्ये कोरोनाला शिरकाव करु दिलेला नाही. त्यामध्ये बेनी बुद्रुक, गोळवशी, पालू, तळवडे, शिरवली, कुरंग, हर्चे, उपळे, भडे, कुर्णे, सालपे, वाडगाव आदी गावांचा समावेश आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असतानाही अद्यापही या गावांमध्ये गेल्या वर्षभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. ग्रामस्थांनी शासनाचे नियम व अटींचे तंतोतंत पालन करत स्वयंशिस्त राखत व ग्रामपंचायतींनी घेतलेली मेहनत व खबरदारी यामुळेच तालुक्यातील १२ गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर ठेवण्यात यश आले आहे.