देवरूख : राज्य शासनाने २० पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील १७० शाळा या धोरणामुळे बंद पडणार आहेत. या निर्णयाविरोधात २१ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने सोमवारी ग्रामस्थ व पालक देवरूख तहसील कार्यालयासमोेर धडकणार आहेत.नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष बबन बांडागळे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात प्रत्यक्ष विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा दुपारी २ वाजता पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय असा नेण्यात येणार आहे. कोकण विभागाचा विचार करता कोकणातील ठाणे, पालगड, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे डोंगर- दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या वाडीवस्तीवर सर्वच ठिकाणी अजून सार्वजनिक दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. पावसाळ्यात चार महिन्यात असलेली दळणवळण व्यवस्थाही कोलमडून पडते. शाळांच्या अंतराचे मॅपिंग करताना दऱ्याखोऱ्यांचा विचार न करता हवाई अंतराचे मॅपिंग केलेले आहे. प्रत्यक्ष चालत जाणेचे अंतर व हवाई अंतर यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे बांडागळे यांनी म्हटले आहे.इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांचे नजिकच्या शाळेत स्थलांतर केल्यामुळे त्यांची शाळेची उपस्थिती, रोजचा प्रवास, या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्या यातून त्यांच्या मनात शिक्षणाबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती आहे. संगमेश्वर तालुक्यात एकूण असलेल्या ३८० शाळांपैकी १७० शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील सुमारे २५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शाळा बंद करू नयेत म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ या सर्व समितीचे सदस्य पंचायत समिती कार्यालय ते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाने धडकणार आहेत. तरी २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण त्वरित मागे घ्यावे व दऱ्याखोऱ्यातील वस्ती, तांड्यावरील मुलांना वस्तीवर दर्जेदार शिक्षण व्यवस्था करावी, अशी मागणी बांडागळे यांनी शासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)साडेबारा हजार शाळाराज्यात २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. २० पटाच्या आतील सुमारे १२,६०० शाळा असून, त्यामध्ये सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा अतिदुर्गम वाडीवस्ती तांड्यावरच्या आहेत, असे बांडागळे यांनी सांगितले.
देवरूखात आज ग्रामस्थ धडकणार
By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST