खेड : शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत बेकायदेशीररित्या आपली दुकाने उघडी ठेवून शासनाच्या आदेशकडे दुर्लक्ष करून ग्राहकांची गर्दी केल्याप्रकरणी गुरुवारी ८ रोजी खेड पोलिसांनी तीन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये खेडच्या माजी नगराध्यक्ष ऊर्मिला शेट्ये-पाटणे यांचाही समावेश आहे.
अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दुकाने वगळता इतर सर्व दुकानांना सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नगर व तालुका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही खेड बाजारपेठेतील वाळकी गल्ली येथील माजी नगराध्यक्ष ऊर्मिला शेट्ये-पाटणे यांनी सौंदर्यप्रसाधन साहित्याचे दुकान गुरुवारी ८ रोजी सकाळी ११ वाजता सुरू ठेवले हाेते. या दुकानात महिला ग्राहकांची गर्दीही झाली हाेती. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल किरण प्रभाकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऊर्मिला शेट्ये-पाटणे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम २६९, रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २-३ प्रमाणे खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे हवालदार प्रशांत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेड बसस्थानकामागील गुरुप्रसाद वडापाव सेंटरमध्ये गुरुवारी दि. ८ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकांची गर्दी केल्याप्रकरणी दुकान मालक प्रसाद देवाडीगा (३६, रा. पाण्याच्या टाकीमागे, खेड शहर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच भरणे-दापोली मार्गालगत असलेल्या बसस्थानक नजीकच्या कन्हैया आईस्क्रीम सेंटर यांनी गुरुवारी दि. ८ रोजी सायंकाळी ३.३० वाजता शासनाचे नियम पायदळी तुडवले म्हणून नियमबाह्य आईस्क्रीम विक्री करण्यासाठी लोकांची गर्दी केली म्हणून दुकान मालक सुनील भुपेंद्र ठाकूर (रा. भैरभवानी नगर, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारपासून सलग तीन दिवस प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. जनतेने शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे, नियम मोडल्यास अशाच प्रकारची कायदेशीर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांनी सांगितले.
--