गुहागर : गुहागर तालुक्यातील ३ हजार ८८६ शेतकऱ्यांना तब्बल ३ कोटी २ लाख ७४ हजार ८५४ रुपये आंबा व काजू नुकसानभरपाई आली आहे. मात्र, त्याच्या वाटपाबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने वाटपामध्ये सावळागोंधळ होण्याची शक्यता आहे. या नुकसानभरपाई वाटपाची जबाबदारी कृषी विभागाऐवजी महसूल विभागाकडे देण्यात आली असून, प्रत्येकाच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा होणार आहे.यावेळच्या अवेळी पावसामुळे गुहागर तालुक्यातील २९/८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा क्षेत्र १९९१.८१ हेक्टर काजू क्षेत्र ९२६.२० हेक्टर आहे. आतापर्यंतच्या आलेल्या नुकसानभरपाईच्या वाटपामध्ये स्पष्ट निर्देश होता. परंतु यावेळी आलेल्या नव्या वाटपामधील जीआरमध्ये कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने वाटपाबाबत सावळागोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन २०११ सालामध्ये मिळालेल्या ४ कोटी २ लाख रुपये नुकसानाच्या निधीचे वाटप गुहागर तालुका कृषी विभाग गत महिन्यापर्यंत करत होते. मे महिन्यात ५० हजार रुपये नुकसानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. सातबारावर कसणारा वेगळाच असल्याने तसेच ज्याची आंबा बागायत आहे, मात्र नावे सर्वांची आहेत, अशांना ही रक्कम वाटली जात असल्याने निर्माण झालेल्या वादामध्ये तालुक्यातील दोन कोटी नुकसानभरपाई रक्कम परत केली होती. एका शेतकऱ्याला कमीत कमी १ हजार रुपये रक्कम मिळाली, तर सातबारावरील जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंचीच नुकसानभरपाई देऊ शकतो, असे नियम होते. पंरतु यावेळी वाटपाबाबतचे कोणतेच निकष नसून या नुकसानभरपाईची रक्कम महसूल विभागाकडे देण्यात आली आहे.दमऱ्यान, महसूल विभागाने तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, सातबाऱ्यावर असलेल्या व्यक्तींचे खाते क्रमांक यांची माहिती मागवली असून, सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. एकत्र सातबारा असला तरी त्यामध्ये बागायती मात्र एकाचीच असल्याने महसूल विभागाकडून वाटप करण्यात येणारी आॅनलाईन रक्कमही सर्वांनाच मिळणार आहे. परिणामी कुटुंबामध्ये अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्याची बागायत त्यालाच ही रक्कम मिळेल असे सर्वे करताना कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवकांकडून सांगण्यात आले. परंतु ही रक्कम आॅनलाईन जमा होणार असल्याने आता प्रत्येकाला खाते उघडावे लागणार आहे. कोणतेही निकष नसल्याने या नुकसानभरपाईच्या वाटपाला नक्की कोणते निकष लावणार असा सवाल अनुत्तरीतच आहे. (वार्ताहर)
गुहागरसाठी तीन कोटींची भरपाई
By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST