चिपळूण : शहरातील नगर परिषद मालकीच्या ५ शाळा भाडे तत्वावर जिल्हा परिषदेकडे चालवण्यास देण्यात आल्या आहेत. या शाळांचे अंदाजे २४ लाख रुपये भाडे थकित असल्याने १० मेनंतर शाळा ताब्यात घेण्याचा ठराव नगर परिषदेच्या आज शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत घेण्यात आला.नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रकाश पाटील आदींसह सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. २००५ मध्ये झालेल्या महापुरात रामतीर्थ परिसरातील जलतरण तलाव नादुरुस्त झाला होता. या तलावासाठी अंदाजे ३५ ते ४० लाख रुपये खर्च करुन नव्याने हा तलाव गेल्या वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आला. या तलावाचा ठेका हेमंत शिंदे यांना देण्यात आला होता. शिंदे यांना मुदतवाढ देण्यावरुन विशेष सभा गाजली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा जलतरण तलाव चालवला जात असून वर्षभरात अंदाजे १ लाख ७० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून हा तोटा भरुन काढण्यासाठी प्रशासनाने मदत करावी असे ठेकेदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. मात्र, तलावाच्या कामासाठी मुदतवाढ देण्यावरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये एकमत न झाल्याने अखेर १ जूनपासून हा तलाव बंद करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. या कालावधीत पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये शशिकांत मोदी, समीर जाधव, अविनाश केळस्कर, इनायत मुकादम, शिल्पा खापरे यांची निवड करण्यात आली असून हा जलतरण तलाव ना नफा ना तोटा या तत्त्वावर कसा चालेल याचीही पाहणी समिती करणार आहे. ठेकेदाराला दिलेल्या मुदतीनंतर निविदा प्रक्रिया राबवून तलाव चालवण्याचे काम देण्याबाबतही चर्चा झाली. हद्दिमध्ये पेठमाप मराठी व उर्दू, शिवाजी चौक नं. १, पाग मुलामुलींची शाळा, कन्या शाळा, वडार कॉलनी या ५ शाळांचे गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेचे जिल्हा परिषदेकडून अंदाजे २४ लाख रुपये भाडे येणे बाकी आहे. वारंवार पत्रव्यवहार करुनही संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक सहकार्य मिळत नसल्याने अखेर या शाळा १० मे नंतर शाळा ताब्यात घेण्याचा ठराव करण्यात आला. या शाळांना प्राथमिक स्वरुपात प्रथम नोटीस पाठवण्यात यावी, अशी सूचना शिक्षण समिती सभापती निर्मला चिंगळे यांनी केली. (वार्ताहर)
‘त्या’ पाच शाळा नगरपरिषद घेणार ताब्यात
By admin | Updated: March 28, 2015 00:09 IST