मिलिंद चव्हाणकडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना करावा लागत आहे. गेली सत्तर वर्षे ही पारंपरिक स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली असल्याने येथील ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरण्याचा तयारीत असल्याचे समजते.कडवई वाणीवाडी, बाजारपेठ, तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गालगत नदीपलीकडे एक स्मशानभूमी आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून येथील ग्रामस्थ या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. मात्र, या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यामध्ये तर मोठ्या पाण्यातून कसरत करत शव अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागत आहे. अनेक वेळा मुसळधार पाऊस असताना येथील तरुण मानवी साखळी करून शव पलीकडे नेतात. अशावेळी काही अनुचित प्रकारही घडले आहेत. मात्र, तरुणांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला.यापूर्वी या स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. आता हा वाद येथील ग्रामस्थांनी सामोपचाराने सोडवला आहे. मात्र, येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता व पूल व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ अनेक वर्षे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, यापूर्वी हा वाद न्यायालयात असल्याचे कारण सांगून या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या.मात्र, आता हा वाद संपला असून, प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष घालून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व पूल बांधण्यासाठी तरतूद करून ग्रामस्थांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर नाइलाजाने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या मन:स्थितीत येथील ग्रामस्थ असल्याचे दिसून येते.आता जागेबाबतचा वाद मिटला असल्याने जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग तयार करावा, अशी कळकळीची मागणी आता ग्रामस्थ शासनाकडे करत आहेत.
Ratnagiri: स्मशानभूमीत जाण्यासाठी सोसावे लागतात अपार कष्ट, कडवई वाणीवाडी बाजारपेठ येथील ग्रामस्थांचा अक्षरशः मृत्यूशी सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:38 IST