रत्नागिरी : प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील गणिताची भीती घालवून त्याला गणित विषयात पारंगत करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत ‘मॅथ्स चॅम्पियन क्लास’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळ आणि पोमेंडी बीट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक परिषदेत प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून, त्याची सुरुवात रत्नागिरीतून करण्यात आली आहे.यावेळी नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुधाकर मुरकुटे, माध्यमिक प्रभारी शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, कोकण मंडळाच्या सहायक सचिव प्रेरणा शिंदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. बी. सोपनूर, विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, दीपक माळी उपस्थित होते.शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले की, जीवनाचे गणित समजणाऱ्यांचे आयुष्य खूप सुंदर असते. गणित हा जीवनाचा मुख्य पाया असून, यशस्वी आयुष्य आणि करिअरसाठी गणित शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गणिताला विज्ञानाचा कणा म्हटले जाते आणि मानवी जीवनाची कल्पना गणिताशिवाय अशक्य आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना गणिताच्या कार्यपद्धतीची सखोल समज आवश्यक आहे. अभ्यासक्रम, उद्दिष्टे आणि साध्य यांचा समन्वय साधताना हा उपक्रम यशस्वी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे गणित शिक्षण अधिक सुलभ होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीत मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
पहिले शिक्षण मंडळसुधाकर मुरकुटे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळ हा महाराष्ट्र आणि देशात मॅथ्स चॅम्पियन क्लास घेणारा पहिला शिक्षण मंडळ ठरला आहे.