चिपळूण : तालुक्यातील टेरव खडबडा येथे गुरुवारपासून आज (शनिवार) अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून सहा कोळसाभट्टया उध्वस्त केल्या. या प्रकरणी टेरव येथील मिलिंद विलास कदम या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेरव येथील जंगलात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वृक्षतोड करुन कोळसाभट्टया लावल्या जातात. यापूर्वीही अशाप्रकारची कारवाई याठिकाणी झाली आहे. एकनाथ माळी यांनी याबाबतची तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेत फेबु्रवारी महिन्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून कोळसाभट्टया उध्वस्त केल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतरही कोळसाभट्टया लावण्यात आल्या. त्यामुळे वन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी जी. एम. कोले, फिरत्या पथकाचे वन क्षेत्रपाल एस. डी. पाटील, वनपाल आर. बी. पाताडे, वनरक्षक जितेंद्र बारशिंग, तौफिक मुल्ला, महादेव पाटील, आदींच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी टेरव येथील खडबडा येथे ही कारवाई केली. यावेळी टेरवचे पोलीसपाटील सुहास मोहिते, तक्रारदार एकनाथ माळीही उपस्थित होते. या परिसरात गुरुवारी विनापरवाना चार कोळसाभट्ट्या लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी चारही भट्टया पंचासमक्ष पेटवून नष्ट केल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत मिलिंद कदम यांना विचारणा केली असता, त्या आपल्या मालकीच्या असल्याची त्यांनी कबुली दिली. दरम्यान परिसरात पडलेली एक घनमीटर जळाऊ लाकडे यावेळी जप्त करण्यात आली. विनापरवाना वृक्षतोडप्रकरणी आवश्यक कागदपत्रे सात दिवसात वन विभागाच्या कार्यालयात देण्याचे कदम यांनी कारवाईवेळी मान्य केले.शुक्रवारी पुन्हा खडबडा येथे संतोष राजाराम कदम यांच्या दोन भट्टया आढळल्या. वन विभागाने कारवाई केली असता, कदम यांनी अडथळा केला होता. आज (शनिवारी) वन विभागाचे कर्मचारी पुन्हा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह चौकशीसाठी गेले असता, दोन्ही कोळसाभट्टया फोडून भट्टयांचे जळाऊ लाकूड संतोष कदम यांच्या टेरव-निम्मेवाडी येथील राहत्या घरात नेल्याचे निदर्शनास आले. पोलीसपाटील मोहिते यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन हे लाकूड जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी जी. एन. कोले, वनपाल आर. बी. पाताडे, सुभाष नाईक, गुहागर वनपाल गुरव, जितेंद्र बारशिंगे, एम. जी. पाटील, आदींनी केली. (प्रतिनिधी)
टेरवला सहा कोळसाभट्टया उद्ध्वस्त
By admin | Updated: March 13, 2016 01:23 IST