लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना करीत जड अंत:करणाने दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला शनिवारी निरोप देण्यात आला. ढाेल-ताशांविनाच गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी गणेशभक्तांनी काेराेनाचे संकट दूर करा, असे साकडेही घातले.
गणेशचतुर्थीला जिल्हाभरात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यातील १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. घरोघरी भाद्रपद चतुर्थीला शुक्रवारी गणपतीमूर्तींचे आगमन झाले होते. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत हाेते. कोरोनामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करीत अनेक भाविकांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्याचा मान राखत अनेकांनी घराशेजारील विहीर, पिंप तर शहरातील भाविकांनी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन केले.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात माळनाका उद्यान, लक्ष्मी चौक उद्यान, नूतननगर उद्यान, विश्वनगर उद्यान या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. याशिवाय घराबाहेर विसर्जनासाठी बाहेर न पडणाऱ्या नागरिकांकडील गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन करण्यात आले. सायंकाळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जनस्थळी नेण्यात येत होत्या.
----------------------
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकांतर्गत घरगुती ६३५, ग्रामीण ११७, जयगड ३२१, संगमेश्वर ७४१, राजापूर १६८०, नाटे ५४८, लांजा १२५, देवरुख २६५, सावर्डे १४०, चिपळूण २६९३, गुहागर ९३७, अलोरे २००, खेड ९५८, दापोली १३००, मंडणगड ९२४, बाणकोट २२३, पूर्णगड १३७, दाभोळ ३९० मिळून एकूण १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.