खेड : कोकण विकास समितीमार्फत कोकणातील विविध समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने खेडमध्ये आलेले केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले.
कोकण विकास समिती या संघटनेत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरातील कार्यकर्ते काम करीत आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष जयवंत दरेकर, ऋषिकेश मोरे, सुनील शिंदे, अनिल कदम, अनिल फाळके, वैभव दरेकर, मनोज सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, महेश चव्हाण, प्रमोद कदम, हेमंत दरेकर, प्रवीण सुर्वे, भावेश सुर्वे व हर्षल भोसले आदी उपस्थित होते.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, दादर ते खेड-चिपळूण नवीन रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेसला खेड थांबा, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच आरोग्य केंद्र, आधुनिक इमारतींसह अत्याधुनिक लॅब, सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. मशीन आदी अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा मिळाव्यात तसेच तज्ज्ञ, डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करावेत, आयएएस-आयपीएस व इतर सनदी अधिकारी तसेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसारख्या स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करून घेतली जाईल, अशी कोकण एज्युकेशन अकॅडमीची निर्मिती व्हावी, आय. टी. पार्क, तुळशी रोड जंक्शन - विन्हेरे - करंजाडी - नडगाव - सव - वहूर - दासगाव या नजीकच्या नवीन मार्गाची निर्मिती करावी, गणपती कालावधीमध्ये कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या मिळाव्यात आणि नवीन थांबे मिळावे, सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ असे नामांतर करावे, करंजाडी, सापे-वामने, विन्हेरे आणि दिवाण खवटी येथे गणपती विशेष गाड्यांना थांबे, मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान नवीन इंटरसिटी सुरू करावी, दिवाणखवटी रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, कोळी बांधव तसेच कोकणातील बागायतदार यांना त्यांचे हक्काचे अस्तित्व निर्माण होईल, असे शासकीय स्तरावर प्रयन व्हावेत, स्वयंरोजगारासाठी तालुका, जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय बँकांना पतपुरवठा करण्यास केंद्र सरकारकडून आदेश व्हावेत, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात नवीन एमआयडीसीची निर्मिती व त्यामध्ये स्थानिक तसेच सलग तालुक्यांना नोकऱ्या व पूरक व्यवसायामध्ये संधी उपलब्ध व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.