khed-photo101 खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांच्याशी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. विक्रांत पाटील व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने शुक्रवारी ९ एप्रिल रोजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना फैलावर घेतले. लवकरात लवकर शासकीय
कोविड केअर सेंटर सुरू झालेच पाहिजे, अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन
शेळके यांच्याकडे केली.
खेड तालुक्यात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून १२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषदेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले असून ३५ ते ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना
बेड शिल्लक नसल्याने एकच गोंधळ उडाला आहे. खेडमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली शुक्रवारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले की, खेडमध्ये बेडची मर्यादा केवळ ७० आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ५० तर खेड नगरपालिका कोविड सेंटर येथे २० ची मर्यादा आहे आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर जाऊन पोहचली आहे. रुग्णांच्या
संख्येत वाढ होत आहे. अशावेळी शासनाचा आरोग्य विभाग धीम्या गतीने काम करत असून, अगोदर सुरू केलेले लवेल येथील शासकीय कोविड सेंटर बंद केल्यामुळे ही वेळ आली आहे. हे काेविड केअर सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी वैभव खेडेकर यांनी केली.
कोरोना लसीचा साठा संपला आहे. ज्यांनी एक लस घेतली त्यांना दुसरा डोस उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आरोग्य विभागाची आहे. कसलेही नियोजन जिल्हा आरोग्य विभागांतर्गत झालेले दिसत नसून त्यांच्या माध्यमातून केवळ रुग्णांची हेळसांड झालेली पाहायला
मिळत असल्याचा आरोप नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यावेळी केला आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर आहे. मात्र,
त्यासाठी लागणारे तांत्रिक अधिकारी तसेच फिजिशियन उपलब्ध नाहीत. एका खासगी डॉक्टरला नियुक्त केल्याचे सांगितले गेले आहे. मात्र, तो पूर्णवेळ थांबेल का, असा प्रश्न असून एक डॉक्टर तोही अर्धवेळ कसा सेवा देऊ शकतो. कोरोनाच्या मागील लाटेत हीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यातून आपण काहीच धडा घेतला नाही का, असा सवाल खेडेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
खेड तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लवेल येथे पुन्हा कोविड केअर
सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर
यांना दिली.