शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी येथील कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत शेतकऱ्यांना तूर लागवड प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना लागवडीचे महत्त्व व त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. मंडल कृषी अधिकारी मनीषा जाधव यांनी शेतकऱ्यांना तूर लागवडीमध्ये रस घेतल्यास उत्पन्नाचे साधन बनेल असे सांगितले.
स्क्रब ड्रेसचे वितरण
देवरुख : सामाजिक बांधीलकी संस्था, मुंबई नालासोपारा यांच्याकडून वुमन्स हॉस्पिटल येथील परिचारिकांना स्क्रब ड्रेसचे वितरण करण्यात आले. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध शहरांत काम सुरू आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गरीब महिला, मुलांसाठी संस्था कार्यरत असून गतवर्षी औषधे ठेवण्यासाठी रॅक देण्यात आली.
योगासनांबाबत मार्गदर्शन
चिपळूण : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जागतिक योगदिनाचे औचित्य साधून न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगासनाचे धडे देण्यात आले. लेडीज जिम संस्थेच्या योग प्रशिक्षक प्रणिता धामणस्कर यांनी मार्गदर्शन केले. तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष एन. एस. मोमीन यांनी योगाचे महत्त्व विषद केले.
गुरव यांची निवड
रत्नागिरी : श्री रायगड संस्थान, जामखेडतर्फे वडु, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी चिन्मय सुधीर गुरव (हर्णै) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा युवती प्रमुखपदी सानिया यादव (वाटुळ), तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून अक्षय माळी (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली.
शाळा भेट
देवरुख : साखरपा क्रमांक १ केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख रामचंद्र कुवळेकर यांनी केंद्रातील शाळांना भेट देऊन ऑनलाईन अभ्यासाची पाहणी सुरू केली आहे. कबनूरकर स्कूल, तुकाराम गणशेठ गांधी हायस्कूल या दोन कनिष्ठ महाविद्यालयांनाही त्यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. ऑनलाईन शिक्षणाबाबत चर्चा करून येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या.
शासनाची अनास्था
रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समिती इमारत दहा वर्षांपूर्वी स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र, नवीन इमारतीच्या भूमिपूजनाबाबत शासन व लोकप्रतिनिधींमध्ये अद्याप अनास्था निदर्शनास येत आहे. अद्याप या इमारतीबाबत कोणालाही स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. इमारतीच्या भूमिपूजनाचा नारळ कोण फोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण
चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे चिपळूण काँग्रेसतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. महिनाभरापूर्वी कर्मचारी व रुग्णांसाठी पाच हजार मास्कचे वाटप करण्यात आले होते.
घनकचऱ्याचा वापर
दापोली : येथील निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘कचरामुक्त मी’ अभियानांतर्गत घनकचरा संकलन केले जाते. प्रतिष्ठानतर्फे ७० गोणी अविघटनशील कचरा पनवेल येथील पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात आला. शनिवार, रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत नागरिकांना घरातील वर्गीकरण व स्वच्छ केलेला कचरा निवेदिता प्रतिष्ठानच्या जालगाव येथे संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले होते.
चालकांची गैरसोय
रत्नागिरी : जिल्ह्यात बांधकाम विभागाकडून निविदा काढून रस्त्याच्या बाजूला सूचना फलक लावले जातात. परंतु, लावण्यात आलेले यापूर्वीचे फलक अत्यंत तकलादू असल्याने गायब झाले आहेत. काही मोडून पडले आहेत. सूचना फलक गायब असल्याने चालकांची गैरसोय होत आहे.