चंद्रनगर (ता. दापाेली) शाळेत जागतिक जलदिनानिमित्त आयाेजित केलेल्या कार्यक्रमात श्रावणी मुळे या विद्यार्थिनीने पाणी वापरासंबंधीचे शपथपत्र वाचून दाखविले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा कोळेकर यांनी जलदिनाचे विशेष महत्त्व व प्रास्ताविक केले. शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी पाण्याचे महत्त्व, वापर व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सांगितली.
बाबू घाडीगांवकर यांच्या कल्पनेतून नियोजन केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे सादरीकरण केले. श्रावणी मुळे या मुलीने पाण्याच्या वापरासंदर्भात स्वतः लिहिलेले शपथपत्र वाचून दाखविले. धीरज शिगवण याने पाण्याच्या वापरासंदर्भात स्वतः लिहिलेली घोषवाक्ये सादर केली. लक्ष्मी शर्मा हिने पाण्याची गोष्ट सांगितली. वेदांत पवार याने पाणी या विषयावर लिहिलेल्या स्वरचित कवितेचे गायन केले. सेजल कोळंबे या विद्यार्थिनीने प्रिय पाण्याला कृतज्ञतापूर्वक लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर या विषयावर आयोजित चित्रकला उपक्रमात सहभाग घेतला. मनोज वेदक, अर्चना सावंत, मानसी सावंत यांनी पाण्याच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन केले. शेवटी सेजल कोळंबे या विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानले.