अवघे चिपळूण उद्ध्वस्त, मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:42+5:302021-07-25T04:26:42+5:30

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. ...

Slightly crushed, speeding up relief work | अवघे चिपळूण उद्ध्वस्त, मदतकार्याला वेग

अवघे चिपळूण उद्ध्वस्त, मदतकार्याला वेग

Next

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता शहरातील पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शासकीय आपत्कालिन यंत्रणेपेक्षा स्थानिक लोक व रत्नागिरी, जयगड, दाभोळ या भागातून पाणी व खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत. शनिवारी सकाळपासून व्यापाऱ्यांनी व नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बाजारपेठेत साफसफाई मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर खराब झालेल्या मालाचे ढिगारे रचले आहेत.

यापूर्वी २००५मधील महापुराची रेषा लक्षात घेता, काहींनी अंतिम टप्प्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि काही तासातच होत्याचे नव्हते झाले. साधारणपणे चिपळूण बाजारपेठेतील तीन हजार दुकाने तर ५ हजाराहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. काहींच्या मदतीला सोसायटीतील लोकं वेळीच धावून काही प्रमाणात नुकसान टाळता आले. बऱ्याचजणांनी वरच्या मजल्यावर साहित्य हलवले. परंतु, बंगल्यात राहणाऱ्यांच्या मदतीला कोणीही न गेल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

आरोग्य विभागाकडून १५ आरोग्य पथकांच्या माध्यमातून त्या - त्या भागात वैद्यकीय मदत दिली जात आहे. याशिवाय नगर परिषदेचे ८० सफाई कामगार सफाई मोहिमेत सहभागी झाले आहेत. बहुतांशी दुकानांबाहेर खराब झालेल्या मालाचे ढीग साचल्याने त्या - त्या मालाचा पंचनामा सुरु केला आहे. मात्र, त्याचवेळी पंचनामे कशा पद्धतीने करणार व नुकसानभरपाईचे निकष जाणून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी अद्यापही दुकाने उघडलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती व उपाध्यक्ष सुभाष बने व कोकण आयुक्तांनी शनिवारी बाजारपेठेत पाहणी करून नियोजनासाठी बैठक घेतली. त्यानुसार तातडीने मदतकार्य व उपाययोजना सुरु केल्या आहेत.

-----------------------------

अजूनही मदत पोहोचली नाही

महापुराची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही तास उलटले तरी शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, वाणी आळी, काविळतळी, शंकरवाडी, मार्कंडी, रावतळे, बुरमतळी, पागमळा, खेंड या भागालाही महापुराचा जोरदार फटका बसला आहे. मात्र, अजूनही या भागात कोणतीही मदत पोहोचलेली नाही. या भागात खाद्यपदार्थ व पाण्यासाठी मोठी ओरड सुरु झाली आहे.

----------------------------

बँका, मेडिकललाही मोठा फटका

शहरातील बहुतांशी बँका व मेडिकल तळमजल्यात व मुख्य रस्त्यालगत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी चिपळूण अर्बन बँक व अन्य शासकीय बँका व एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सर्व मेडिकल पाण्याखाली गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------

पाण्याचा प्रश्न गंभीर

सध्या नगर परिषदच्या खेर्डी व गोवळकोट येथील पंप हाऊसची यंत्रणा निकामी झाल्याने व विहिरीत पुराचे पाणी जाऊन गाळ साचल्याने शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. त्यासाठी दोन २५० किलो व्हॅटचे जनरेटर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ते उपलब्ध होताच शहरात पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.

Web Title: Slightly crushed, speeding up relief work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.