लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकाने बंद असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले हाेेते; तर गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये भयाण शांतता पाहायला मिळाली. दापाेलीत व्यापाऱ्यांनी वीकेंड लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेतल्याने दापाेलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने १०० टक्के बंद हाेती.
शहरातील केळकर नाका, मच्छी मार्केट या वर्दळीच्या ठिकाणीही नीरव शांतता पसरली हाेती. दवाखाने, मेडिकल याव्यतिरिक्त कोणीही अनावश्यक बाहेर पडताना दिसले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत हाेती. अनेकांना अर्ध्या रस्त्यातूनच घरी पाठवण्यात आले. दापोली नगरपंचायत प्रशासन आणि दापोली पोलिसांचे पथक शहरात तैनात करण्यात आले हाेते.
शहरात माेठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांनी शहरात येणे टाळले हाेते. त्यामुळे दापोली एस. टी. स्टँड व इतर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बंदमुळे एस. टी. प्रशासनाने गाड्याही बंद ठेवल्या हाेत्या. दापोली शहरातील सर्व चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची चौकशी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात हाेता. दापोली शहरातील पोलीस व पोलीस मित्र संघटना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बंदोबस्त करत होते.