लांजा : आॅनलाईन सातबारा कार्यक्रमात सातत्याने येत असलेला व्यत्यय; परिणामी सातबाराधारकांची होणारी सातत्यपूर्ण परवड या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवींच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. दि. १७ डिसेंबर रोजी लांजा तालुक्याचा दौरा करणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी काही वर्षांपूर्वी तर काही ठिकाणी काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. परंतु अपुरा कर्मचारीवर्ग, इंटरनेटची अनुपलब्धता, आवश्यक यंत्रणेचा अभाव आदी विविध बाबींमुळे काही ठिकाणी आॅनलाईन सातबारा कार्यक्रमाला लगाम बसला असून, हस्तलिखित सातबारा देणेही बंद ठेवल्याने समस्त सातबाराधारकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होऊ लागली.सातबारासारखा मूलभूत दस्तऐवज उपलब्ध होत नसल्याने दैनंदिन होणारे व्यवहार ठप्प होण्याचेही प्रकार सातत्याने घडू लागले होते. ग्रामीण भागातील सातबाराधारकांनी सातबारा उताऱ्याची मागणी केल्यानंतर आॅनलाईनची प्रक्रिया चालू असून, हस्तलिखित सातबारा देणे बंद असल्याची उत्तरे तलाठी व तहसील कार्यालयाकडून देण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर लांजा आमसभेत ग्रामस्थांकडून याबाबतच्या असंख्य तक्रारी आमदार राजन साळवी यांच्याकडे सादर करण्यात येत होत्या. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारीवर्ग समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने साळवी यांनी त्यांची अनेकवार कानउघाडणीदेखील केली होती.सरतेशेवटी लांजा व राजापूर शिवसेनेच्यावतीने संबंधित तहसीलवर मोर्चादेखील काढण्यात आला होता. परंतु हतबल असलेल्या तहसील प्रशासनाने याबाबत कोणताही ठोस प्रतिसाद न दिल्याने शेवटी आमदार राजन साळवी यांनी नागपूर येथे राज्याच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन आॅनलाईन सातबाराप्रकरणी जनतेची होणारी ससेहोलपट निवेदन व चर्चेव्दारे बोलून दाखवली. त्यानंतर या विषयावर गंभीरपणे चर्चा सुरु झाली.खडसे यांनीही या गंभीरविषयी तत्काळ कार्यवाही करीत याबाबतच्या पुढील कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित केल्या. त्यानुसार साळवींनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची याबाबत पुन्हा भेट घेऊन खडसे यांच्यासोबत झालेली सकारात्मक चर्चा व खडसे यांच्या निर्देशाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सातबारा हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, याबाबतचे सुलभ वितरण हा सातबाराधारकांचा मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. लांजा - राजापूर - साखरपा मतदारसंघातील आॅनलाईनप्रकरणी कोणत्या त्रुटी असल्यास त्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने आपण त्वरित कार्यवाही करू, असे स्पष्ट केले. त्यानुसार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लांजा तहसील कार्यालयात उपस्थित राहून याबाबतच्या सातबाराधारक तसेच तहसील यंत्रणेच्या समस्या समजावून घेऊन याअनुषंगाने उचित कार्यवाही करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांना दिले.त्यानुसार लांजा व राजापूर तालुक्यातील जनतेच्या सातबारा उपलब्धतेच्या अनुषंगाने कोणत्या तक्रारी, समस्या वा शंका असल्यास त्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, लांजा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सातबाराप्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
By admin | Updated: December 15, 2015 00:40 IST