रत्नागिरी : शहराला लागून असलेल्या जाकिमिऱ्या गावातील श्री नवलाई पावणाई देवस्थानाने पुढाकार घेऊन देवस्थानच्या अंतर्गत येणाऱ्या पाच वाड्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत मिऱ्याच्या सदस्य कमिटीच्या सहकार्याने कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांसाठी गृहविलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
गावातील घरांची रचना दाटीवाटीची असल्यामुळे आणि शहरातील रुग्णालयांमध्ये सहजासहजी बेड उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या काळजीपोटी अशी व्यवस्था केल्याचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अंकुश शिवलकर यांनी सांगितले. अशा प्रकारची स्वतंत्र विलगीकरण करण्याची व्यवस्था ही लोकसहभागामुळे करणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.
ग्रुप ग्रामपंचायत मिऱ्या यांनी ग्रामपंचायतीचा हॉल उपलब्ध करून दिला असल्यामुळे सर्वात मोठी होणारी गैरसोय दूर झाली आहे, त्याचबरोबर हॉटेल विहारचे मालक बबन पटवर्धन यांनी मोफत बेडची व्यवस्था करून दिली आहे. माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी इतर लागणारी व्यवस्था पुरवली असून, गावातील काही तरुण मुलांनी तेथील नियोजनाची जबाबदारी स्वतः पुढे येऊन स्वीकारली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले आहे.
देवस्थानाच्या या उपक्रमाचे मिऱ्या ग्रामस्थांनी कौतुक केले असून, आभारही मानले आहेत.
गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी आणि स्थानिक पर्यटकांनी कारण नसताना येऊ नये, असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत मिऱ्याच्या सरपंच आकांक्षा कीर यांनी केले आहे.
अशा प्रकारे सर्व गावांनी आदर्श घेऊन, अशी सेवा केंद्रे उभारली तर लवकरच कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर मात करण सोपे होईल.
..........................
रत्नागिरी शहरानजीक मिऱ्या येथे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.