गुहागर : तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रा. अमोल जड्याळ यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ही बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मयुरी शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नियम धाब्यावर
रत्नागिरी : गेले काही महिने प्रशासनाने निर्बंध लागू केले होते. त्यामुळे नागरिक घरी थांबले होते. परंतु, आता संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्याचबरोबर सध्या काही नागरिकांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविण्यास सुरुवात केली आहे.
जन्माष्टमी साजरी
दापोली : तालुक्यातील जालगाव येथील बहुविकलांग दिव्यांग गतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी दापोली लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुलांना खेळाचे साहित्य वाटण्यात आले. तसेच स्वरांगी करंदीकर हिच्या गाण्याचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शन शिबिर
मंडणगड : तालुका विधी सेवा समिती, दापोली-मंडणगड यांच्यावतीने तालुक्यातील कोंझर धनगरवाडी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेथील हनुमान मंदिरात दापोली न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी. एस. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावात कोरोना काळात काम केलेल्या शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक तसेच गावातील स्वयंसेवकांचा प्रशस्तीपत्रक देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.