रत्नागिरी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदाेलन न करण्याचे केलेले आवाहन यामुळे १ मे २०२१ राेजी एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी करण्यात येणारे आंदाेलन स्थगित करण्यात आले आहे. ही माहिती निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर ग्रुपचे संदेश जिमन यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात दररोज ३ लाख हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर, ५०० हून अधिक जणांचा रोज मृत्यू होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे तसेच आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सहकार्याची भूमिका आणि सुरक्षेच्या दृष्टीने नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी करण्यात येणारे उपाेषण स्थगित केल्याचे म्हटले आहे. परिस्थिती निवळल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र, हा थांबा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.