रत्नागिरी : जिल्ह्यातील १९० गावांतील ४९८ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, तो एक कोटी ७५ लाख रुपयांचा आहे़ हा आराखडा लवकरच जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आज, शुक्रवारी दिली़ यावर्षीचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा एक कोटी ७५ लाख रुपयांचा आहे़ विंधन विहिरींची कामे डीपीडीसीमधून घेण्यात येणार असल्याने या आराखड्यातून ही कामे वगळण्यात आली आहेत, असे काळम-पाटील यांनी स्पष्ट केले़ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा नुकताच तयार केला असून, तो लवकरच जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे़ (शहर वार्ताहर)आकडेवारी पुढीलप्रमाणे : मंडणगड - ११ गावांतील १६ वाड्यांमध्ये, दापोली - २० गावांतील ३४ वाड्यांमध्ये, खेड - १९ गावांतील ३२ वाड्यांमध्ये, गुहागर - १० गावांतील २७ वाड्यांमध्ये, चिपळूण - २६ गावांतील ७४ वाड्यांमध्ये, संगमेश्वर - २८ गावांतील ६२ वाड्यांमध्ये, रत्नागिरी - २६ गावांतील ९० वाड्यांमध्ये, लांजा - २२ गावांतील ४५ वाड्यांमध्ये आणि राजापूर तालुक्यातील १८ गावांतील ३८ वाड्यांचा समावेश आहे़ टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठ्यासाठी एक कोटी ७६ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी एक कोटी १२ लाख ५० हजार रुपये, खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ७० हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे़ टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील १९० गावांतील ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावणार आहे़
पावणेदोन कोटींचा टंचाई कृती आराखडा
By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST