रत्नागिरी : जिल्ह््यात आत्तापर्यंत एकूण १५९९०.०४ मिलिमीटर (सरासरी १७७६.६७) पाऊस झाला आहे. गेले चार दिवस पावसाने उसंत घेतली असली, तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. येथील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ४९ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह््यात किमान सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी तर २१३३.१३ मिलिमीटर इतकाच पाऊस जून ते आॅक्टोबरपर्यंत कोसळला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत चांगले राहिले आहे. शेतीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह््यात ६९ हजार ४७९ हेक्टरवर भात लागवड करण्यात येते. आत्तापर्यंत ४८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येत असून, आत्तापर्यंत केवळ १०२० हेक्टर क्षेत्रावरच नागलीची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. भातशेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर नागली लागवड करण्यात येते. त्यामुळे येत्या आठवडाभरात नागली लागवडीची बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरी लागवड एकूण २९.३५ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे.कडधान्य लागवड १४९६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. पैकी २३.१६ हेक्टर क्षेत्रावर ती करण्यात आली आहे. तसेच ११०१.२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यात ५६९४.८ हेक्टर क्षेत्रावर भात, ५३६ हेक्टरवर नागली तर एक हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. लांजा तालुक्यात ५२११.२ हेक्टर क्षेत्रावर भात, तर चार हेक्टर क्षेत्रावर नागली, २३.१६ हेक्टरवर इतर कडधान्य, १०१.२ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात ३३५१.२ हेक्टरवर भात, ६९ हेक्टरवर नागली, १५.३५ हेक्टरवर वरी, १० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात २७८० हेक्टरवर भात व ६५ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात २६५२ हेक्टरवर भात, १६५ हेक्टरवर नागली तर १३ हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ६४०२ हेक्टरवर भात व १७९ हेक्टरवर नागली लागवड करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात ६९८०, राजापूर ६८८०, संगमेश्वर ८१७४.५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पाण्याची उणीव भासणाऱ्या क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्याने आता पाणथळ जागेतील भात लागवड करण्यात येत आहे. जुलै अखेरपर्यंत जिल्ह््यातील भात लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
समाधानकारक पाऊस; शेतीच्या कामांना वेग
By admin | Updated: July 16, 2016 23:32 IST