सचिन मोहिते- देवरुख --गणेशोत्सवासाठी संगमेश्वर तालुका सज्ज झाला असून, गणेश मूर्तीशाळांमध्ये अखेरचा हात फिरवण्याच्या कामात मूर्तिकार व्यस्त झाले आहेत. देवरुख बाजारपेठ विविधांगी देखाव्याच्या मखरांनी, फुलमाळांनी, तोरणांनी सजल्याचे दिसत आहे.संगमेश्वर तालुक्यात घरगुती २५ हजार ७२२, तर आठ सार्वजनिक गणरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. देवरुख, संगमेश्वर बाजारपेठांबरोबरच साखरपा, आरवली, माखजन परिसरातील गावागावात असणाऱ्या बाजारपेठा आता गजबजू लागल्या आहेत. देवरुखसह संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा पानाफुलांच्या विविधरंगी तोरणे व माळांनी, विद्युत रोषणाईच्या तोरणांनी, तसेच विविधांगी देखाव्यांच्या थर्माकोलच्या मखरांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. तसेच आरती, भजन आणि जाखडीच्या नाचाचा सूर कॅसेट सिडीच्या दुकानातून घुमू लागला आहे.गणेशोत्सवासाठी ढोलकी बनवणारे कारागीरदेखील आपल्या कामात दंग झाले आहेत. गावागावातून जाखडीचे सूर आणि सुरावर ठेका धरताना गावातील तरुण कलाकार दिसत आहेत. ‘शक्ती - तुऱ्याच्या’ सामन्यांनी आता ग्लोबल रुप धारण केल्याचेही अनेक ठिकाणच्या सरावावरून दिसत आहे.बाजारात हल्ली थर्माकोलच्या रेडिमेड मखराला मागणी वाढत असून, ५०० रुपयांपासून एक हजारांपर्यंत मखरांची किंमत आहे. देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ हजार १७९ घरगुती, तर ५ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक उत्सवामध्ये देवरुख विठ्ठल मंदिर, नेहरु युवा ग्रामविकास मंडळ, तळवडे, गणेश मित्रमंडळ कोंडगाव, गर्जना मित्रमंडळ, खडीकोळवण, युवा गणेश मित्रमंडळ, निवेबुद्रुक यांचा समावेश आहे. यातील २५३ मूर्ती दीड दिवसाने विसर्जित करण्यात येणार आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये १२ हजार ५४३ घरगुती व ३ सार्वजनिक गणरायांचे आगमन धुमधडाक्यात होणार आहे.
गणेशोत्सवासाठी संगमेश्वर बाजारपेठ सज्ज
By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST