चिपळूण : तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तानाजी चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिपळुणातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासनाच्या नियमांच्या अधीन राहून चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संघाच्या संचालक मंडळ सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीच्या अर्जावर मंजूर करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२० अखेरचा ताळेबंद व दिनांक १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीचे व्यापारी व नफा-तोटा पत्रकास कार्योतर मान्यता देण्यात आली, अशा अनेक विषयांवर सभेची मान्यता घेण्यात आली.
या सभेच्या निमित्ताने चिपळुणातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. भिले सोसायटी चेअरमन रवींद्र तटकरे, ताम्हणमळा माधुरी गोखले, कळवंडे नारायण उदेग, राहुल कदम, असुर्डे गणपत खापरे, कात्रोळीचे अनंत निवळकर, रिक्टोलीचे चंद्रकांत आदवडे, शिरगावचे श्रीधर शिंदे, कळकवणेचे सुरेश शिंदे, नंदकुमार दूध उत्पादक संघाचे किसन माटे यांचा समावेश हाेता.