मेहरून नाकाडे --रत्नागिरी -वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणाकडे ओढा अधिक असला तरी ‘वूड सायन्स’मध्ये पीएच. डी. करणाऱ्यांची संख्या विरळच! शहरातील कीटकनाशके, खते विक्रेते बाबा दळी दाम्पत्याचा मुलगा चारूहास दळी सध्या बेंगलोर येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये बांबू विषयावर संशोधन करीत आहे.ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबापीक दिवसेंदिवस धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिकाकडे वळणे गरजेचे आहे, असे चारूहास दळी यांचे मत आहे. वडिलांचा खते विक्रीचा व्यवसाय असल्याने शाळा सुटल्यानंतर फावल्या वेळेत दुकानात बसत असे. त्यामुळे शेतीची आवड निर्माण झाली. त्याचवेळी आपण काहीतरी वेगळं करावं, अशी इच्छा निर्माण झाली. बारावीनंतर हॉर्टिकल्चरला प्रवेश घेण्याची इच्छा होती. मात्र, माझी निवड फॉरेस्ट्रीसाठी झाली. पदवीनंतर डेहराडून विद्यापीठात दोन वर्षे राहून फॉरेस्ट्रीमध्येच एमएससी केलं. त्यानंतर मात्र ‘बांबू’ विषयावर पीएच. डी. करण्याचे ठरवले. आशियामध्ये फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एकमेव असून, केरळ, जोधपूर व बेंगलोरमध्ये शाखा आहेत. प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर बेंगलोर येथील विद्यापीठात पीएच. डी.साठी प्रवेश घेतला.जंगली वृक्ष तोडण्यासाठी वन खात्याची परवानगी आवश्यक असते. शिवाय झाडांचे दरही अधिक असतात. परंतु बांबू आपल्याकडे कोठेही उपलब्ध होऊ शकतो तसेच बांबूला अधिक मागणी असल्याने शेतकरी बांबूची शेती करू शकतात. डोंगरउतारावर कोठेही बांबू लागवड केली जाऊ शकते. बांबूला पाणी कमी लागते. शिवाय तीन वर्षांपासून बांबू कटाई करणे सोपे होते, इतकी झपाट्याने त्याची वाढ होते. बांबूच्या बेटामुळे परिसरात सावली निर्माण होते. गर्द छाया मिळते व ग्लोबल वॉर्मिंग कमी होते.बांबूपासून गॅस व वीजनिर्मिती केली जाऊ शकते. शिवाय तारकोल, बायो इथेनॉलही तयार केले जाते. बांबूची पाने लांब असल्याने हवेतील कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेतात व भरपूर प्रमाणात आॅक्सिजन सोडतात. त्यामुळे बांबूची विविष्ट प्रकारे लागवड करून ‘आॅक्सिजन’ पार्कची उभारणी केली जाऊ शकते. सध्या शहरातील नागरिक ताजी हवा मिळवण्यासाठी पार्क अथवा ग्रामीण भागाकडे जातात. त्यामुळे भविष्यात कोकणात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता आॅक्सिजन पार्क उभारले तर आर्थिक उत्पन्नाचे साधन नक्कीच उपलब्ध होऊ शकते.बांधकाम व्यवसाय, फर्निचर, बोट हाऊसमध्ये बांबूचा वापर केला जातो. आपल्याकडे मिळणारा बांबू भरीव असल्याने त्याला विशेषत: मागणी होते. कुडाळमध्ये बांबूपासून तयार करणाऱ्या फर्निचरचा कारखाना आहे. लवासा येथील बोट हाऊसमध्ये बांबूपासून फर्निचर बनवण्यात आले आहे. युरोप, अमेरिका तसेच परदेशातील अन्य भागात बांबूला वाढती मागणी आहे. युरोपमधील मंडळींना मात्र गडद रंगाचे फर्निचर आवडते. आपल्याकडचा बांबू ओव्हनमध्ये ठराविक वेळेत, ठराविक अंशाच्या तापमानात ठेवला तर त्याला काळपट रंग येतो. शिवाय त्यापासून तयार करण्यात आलेले फर्निचर टिकाऊ होते. बांबूपासून बनवलेल्या फर्निचरची ३० वर्षे गॅरंटी दिली जात असल्याने फर्निचरला वाढती मागणी आहे.नेटिव्ह फोन बँक प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था शेतकरीनिष्ठ कामे करीत आहे. या संस्थेतर्फे बांबूची रोपे शेतकऱ्यांना मोफत वितरीत केली जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे तो म्हणाला.
चारुहास दळीचे बेंगलोरच्या ‘वूड सायन्स’मध्ये संशोधन
By admin | Updated: July 19, 2016 23:53 IST