रत्नागिरी : समुद्री चाच्यांनी जहाजावरून अपहरण केल्यानंतर २७ दिवस जगाशी काहीही संपर्क नव्हता. या दिवसांत मरणयातना भोगल्या. उपाशी राहून जंगलमय भागात दिवस काढतानाच त्यांचे वागणेही किळसवाणे होते. आई-वडिलांची पुन्हा भेट होईल की नाही, या विचाराने डोळ्यात अश्रू यायचे, हे सुन्न करणारे अनुभव आहेत आफ्रिकेतून सुटका होऊन परतलेल्या समीन जावेद मिरकर (रा. भाटकरवाडा, रत्नागिरी) याचे.‘एमव्ही बिटू रिव्हर’ नावाचे डांबर (बिटुमेन) वाहतूक करणारे जहाज घेऊन दुआला येथे नेत १७ मार्च रोजीच्या रात्री समुद्री चाच्यांनी अचानक बोटीवर हल्ला करून १० जणांना बंदीवान केले. त्यात रत्नागिरीतील समीन आणि रेहान सोलकर हे दोन तरुणही होते. यातील समीनने २७ दिवसांच्या अपहरणाच्या दिवसातील अनुभव सांगितले. हल्लेखोर समुद्री चाच्यांकडे तलवारी, चाकू सुरे, तसेच बंदुकाही होत्या. माझ्यासह काही जण बोटीमध्ये स्वरक्षणासाठी बनविण्यात आलेल्या रूममध्ये लपलो होतो. मात्र, काही वेळातच चाच्यांनी आमच्या त्या रूमचा लोखंडी दरवाजा तोडून आम्हाला ताब्यात घेतले, असे तो म्हणाला.सलग ३० तासांच्या प्रवासानंतर आम्हाला एका जंगलमय बेटावर नेले. तेथे नेल्यावर आम्हाला केवळ झाडाला बांधलेल्या ताडपत्रीचा छताचा आधार होता. समोरच त्यांच्या टोळीतील इतर लोकही होते. मात्र, हे शस्त्रधारी होते. शिवाय त्या भागात आम्ही नवखे होतो. इतर कोणतीही वस्ती असेल असे दिसत नव्हते. आम्हाला दोन-दोन दिवस उपाशीच राहावे लागत होते, असेही समीनने सांगितले.
साप, माकडं हेच त्यांचे खाद्यआम्हाला निर्जन बेटावर घेऊन गेल्यावर तेथे आम्हाला आंघोळीसाठी पाणीही मिळत नव्हते. शिवाय सकाळी मॅगीवरच नाश्ता भागवावा लागत होता. निकृष्ट भात हेच जेवण होते. दोन-दोन दिवस जेवणही मिळत नसल्याने आमचे हाल सुरू होते. मात्र, त्याचवेळी आमच्या आजूबाजूला असलेले बंदूकधारी चाचे जंगलातून साप, माकडं मारून आणून ते खात, असे समीन म्हणाला.
परतलो हे आमचे भााग्यचचाच्यांनी आमच्याजवळील पैसे, मोबाइल, घड्याळ सर्वकाही हिसकावून घेतले होते. २६ दिवसांनंतर अचानक चाच्यांनी आम्हाला एका लहानशा बोटीमध्ये बसवून समुद्रात आणले. काही वेळाने आमच्यासमोर एक बोट आली आणि त्यामध्ये आम्हाला कंपनीच्या माणसाच्या ताब्यात देऊन सोडण्यात आल्यावर ते निघून गेले. त्यावेळी आमची सुटका झाली हे कळल्यावर आम्हाला रडू कोसळले. लागोस येथून इस्तंबूल येथे आणण्यात आले. त्यानंतर आम्ही मायदेशी परतलो हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असेही समीनने सांगितले.
अनेकांनी केले प्रयत्नया अपहरणाच्या घटनेची केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली होती, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्याशी कुटुंबीयांनी चर्चा करून दोघांच्या सुटकेबाबत विनंती केली होती. त्याचबरोबर कॅप्टन फैरोज मुकादम, मुनीर कर्लेकर, मोहम्मद सहर कर्लेकर यांनीही या मुलांच्या सुटकेसाठी पालकांना मदत केली. समीन याने या सर्वांचे आभार मानले.