राजापूरः रिफायनरी प्रकल्पाबाबत नाणार परिसरातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी कोकण शक्ती महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची जोरदार चर्चा सध्या राजापूरमध्ये सुरू आहे. कोकण शक्ती महासंघ म्हणजे राज्य शासनाला समांतर यंत्रणा कार्यान्वित आहे का, याचे स्पष्टीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, सागवे ग्रामपंचायत सदस्य जुनेद मुल्ला व विद्याधर राणे यांनी केली आहे.
कोकण शक्ती महासंघाचे अशोक वालम यांनी या पोस्टमध्ये, रिफायनरी प्रस्तावित असलेल्या काळात ज्या जमिनींची खरेदी-विक्री व्यवहार झाले आहेत, त्यांची चौकशी आपल्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याचे म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावातील सन २०१६ ते २०१९ पर्यंतच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची प्रकरणे तलाठी यांच्याकडे जमा करावीत. ही चौकशी करून व्यवहार रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत. खरेदी-विक्रीचे केलेले व्यवहार रद्द झाले तरी, ज्यांनी जमिनींचे पैसे घेतलेले आहेत, त्यांना व्यवहारातील पैसे परत द्यावे लागणार नाहीत. तुम्हाला कोणालाही पैसे परत देण्याची गरज नाही, असे वालम यांनी स्पष्ट केलेले आहे. याबाबत शासन अथवा प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया विषद करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
रिफायनरीला समर्थन करणाऱ्या सर्व संस्था व संघटनांनी गैरव्यवहारांची कठोर चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. मात्र सद्यस्थितीत मारूनमुटकून तक्रारी निर्माण करण्याकडे प्रकल्पविरोधकांचा कल दिसत आहे. त्यातूनच तक्रारी करा, तुम्ही घेतलेले जमिनीचे पैसे कोणालाही परत द्यावे लागणार नाहीत, असे बेकायदेशीर विधान मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन केले गेले आहे. याबाबत तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.