रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी योजनेसाठी साळवी स्टॉप येथे उभारलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातच कचऱ्याच्या ढीगांना आग लावून देण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण हे कचऱ्याच्या धुरामध्येच होत असून, याच पाण्याचा शहरातील नागरिकांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे पाणी खरोखरच शुध्द स्वरुपात लोकांना मिळते का, असा प्रश्न आता शहरवासीयांमध्येच निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप येथील प्रकल्पात शीळ धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते. मात्र, येथील जलशुध्दिकरण टाकीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. कचऱ्याचे ढीग तयार झाल्याने या भागाला उकिरड्याचे रुप आले आहे. या सुक्या व ओल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये पाळीव जनावरांचा सततचा धुमाकूळ असतो. त्याशिवाय कावळे व बगळे यांचे प्रमाणही या उकिरड्यावर अधिक आहे. कुत्र्यांचे तर या भागात पीक आले आहे. कावळे व अन्य पक्षी येथील मरून पडणाऱ्या उंदिर, घुशी उचलून नेतात व शेजारीच असलेल्या पाणी टाकीच्या कठड्यावर बसतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे कचरा, घाण टाकीत जाण्याची शक्यता नेहमीच असते. परिणामी पाण्यात घाण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घेण्यात आली आहे काय, असा सवाल नागरिकांतूून विचारला जात आहे. कचऱ्याचे ढीग दररोज पेटवले जात असल्याने जलशुध्दिकरणचा परिसर गडद धुराने भरून जातो. तसेच कचरा पेटताना त्यातील काही भाग जळून हवेत तरंगत राहतो, पाण्याच्या टाकीतही हा जळालेला कचऱ्याचा भाग पडतो. त्यामुुळे रत्नागिरीकरांना खऱ्या अर्थाने पिण्याचे शुध्द पाणी मिळायला हवे असेल तर या ठिकाणी असलेल्या कचऱ्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक आहे. तसेच येथील कचऱ्याचे ढीग पेटवण्यापेक्षा कचरा त्याच भागात पुरणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)घोषणांचा झालाय सुकाळ...दांडेआडोमपासून ते पालिकेच्या प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा, नंतर अपार्टमेंटमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणारी यंत्रणा बसविणे यांसारख्या अनेक घोषणा पाहता या घोषणांचा सुकाळ झाला आहे. प्रत्यक्षात कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. यावर कधी आणि केव्हा उपाय योजना करणार असा प्रश्न आहे.
कचऱ्याच्या धुरात जलशुुध्दिकरण !
By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST