रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला शासनाकडून ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून गौरविले गेल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.त्यांची पहिली नियुक्ती नंदूरबार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी जालना येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काही काळ काम केले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची रत्नागिरी येथे जिल्हाधिकारीपदी थेट निवड झाली. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कामकाज पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मार्चमध्ये लोकसभा आणि त्यानंतर आॅक्टोबर २०१४मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. या दोन्ही निवडणुका अतिशय शांततेत पार पाडण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या काळात महसुलात झालेली लक्षणीय वाढ, चौपदरीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, गणपतीपुळे विकास आराखडा, आॅनलाईन सातबारा, मुद्रा योजना, पर्यटन महोत्सव या विशेष कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार जाहीर केला आहे. बुधवार, २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गेल्या दोन वर्षातील कामाची पोचपावती
By admin | Updated: April 20, 2016 01:14 IST