रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट अवाॅर्ड २०२३-२४’साठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे. आंबा उत्पादनासाठी ही निवड झाली आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहायक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी गुरूवारी याबाबत बैठक घेतली तसेच पडताळणीही केली. जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही जिल्ह्याची उत्पादने आहेत. २०१८ मध्ये हापूस आंब्याला ‘जीआय’ टॅग मिळाला आहे. कोकण विभागात १२६.४१ हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये २१३.३७ हजार टन आंबा उत्पादन होते. त्यापैकी केवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६७.७९ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे. त्यातून १२३.०६ हजार टन आंब्याचे उत्पादन होते.सन २०२२-२३ ला कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७,७९६ हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामधून १,२३,०६८ मेट्रिक टन आंबा उत्पादन करून रत्नागिरी प्रथम क्रमांकावर राहिला आहे. सलग दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याला आंबा निर्यातीतून अनुक्रमे १४५.९८ लाख व २५०.८६ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.हापूस आंब्याची सर्वाधिक आयात करणारे देश कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका, बहरिन आणि कॅनडा आहेत. तत्कालीन पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत नेहमीच बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी स्वागत करून सर्वांचे आभार मानले. बैठकीला ‘एमएसएमई’चे मिलिंद जोशी, डीआयसीचे व्यवस्थापक संकेत कदम, डॉ. विवेक भिडे, माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री, हापूस आंबा उत्पादक संघाचे मुकुंद जोशी आदी उपस्थित होते.
‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ अवॉर्डसाठी रत्नागिरीचे नामांकन; देशातील ६०, महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:02 IST