रत्नागिरी : कोकणात सध्या निवडणूक आणि शिमग्याचे वातावरण तापले आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने गावात आले आहेत आणि प्रत्येक गावात शिमग्याच्या पालख्या घरोघरी जाऊ लागल्या आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते यानिमित्ताने लोकांमध्ये जाण्याची संधी सोडत नाहीत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हेही दरवर्षीप्रमाणे आपल्या पाली गावातील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगोत्सवात सहभागी झाले आणि त्यांनी ढोलही वाजवला.शिमगा आणि कोकणाचे नाते खूप जुने. वर्षभर भाविक देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. पण शिमग्यामध्ये देव मंदिरातून बाहेर पडून पालखीत बसून भाविकांच्या घरोघरी जातात. देव घरी येणार म्हणून घरांची रंगरंगोटी केली जाते. अंगण सारवून रांगोळी घातली जाते. केवळ पालखी घरी येणार म्हणून लांबलांबच्या शहरात नोकरी करणारे कोकणवासीय आपले घर गाठतात.रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे लक्ष्मी पल्लीनाथाचा शिमगोत्सवही धुमधडाक्यात सुरू झाला आहे. हे मंत्री उदय सामंत याचे गाव असल्याने येथील शिमगोत्सवाला ते दरवर्षी हजेरी लावतात. गुरुवारी रात्रीही त्यांनी येथे हजेरी लावली आणि ढोल वादनात सहभागही घेतला.
कोकणात शिमगोत्सवाचा माहोल, मंत्री सामंतांनी वाजवला ढोल -video
By मनोज मुळ्ये | Updated: March 22, 2024 13:36 IST