चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकून चालली आहेत. लावणी वेळेत न झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आता पाऊस पडला तरी लावणी करणे अशक्य असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कुणबी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दादा बैकर यांनी केली आहे. कुणबी सेनेतर्फे गुरुवारी तहसीलदार वृषाली पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. दि. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाल्यापासून पेरणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पाऊस पडल्याने रोपे रुजून आली. येथील जमीन डोंगराळ, रेताड व खडकाळ असल्याने व सिंचनाची व्यवस्था नसल्याने पाण्याचा साठा होत नाही. पाऊस महिनाभर लांबल्याने रुजलेली रोपे सुकून चालली आहेत. पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी शासनाने दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख दीपक निवाते, उपशहरप्रमुख अमोल निर्मळ, चंद्रकांत मांडवकर, चिपळूण तालुकाप्रमुख काशिनाथ राणे, विठ्ठल मते, यशवंत भुवड, रवी भाताडे, गणेश फके, भारिपचे सुभाष जाधव यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जाहीर करा
By admin | Updated: July 5, 2014 00:00 IST