रत्नागिरी : मुस्लिम धर्मियांचा ईद उल फित्र ‘रमजान ईद’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सर्व मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते.पवित्र रमजान महिना संपला असून, सोमवारी शेवटचा रोजा ठेवण्यात आला होता. अरब राष्ट्रामध्ये सोमवारी ईद झाल्यामुळे मंगळवारी ईद होईल, असे संकेत होते. मात्र, सोमवारी सायंकाळी झालेल्या चंद्रदर्शनानंतर शाही इमामानी ‘ईद साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर मुस्लिम मोहल्ल्यात ईदची तयारी सुरू झाली. शिरखुर्म्यासाठी दूध खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुकानातून ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.पहाटेच्या (फजर)च्या नमाजला भाविकांची गर्दी झाली होती. त्यानंतर इमामच्या मार्गदर्शनाखाली मशिदीतून ‘रमजान ईद’चा खास नमाज अदा करण्यात आला. तत्पूर्वी सर्वांनी फित्रा वाटप केले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट करून अभीष्टचिंतन करीत ईदच्या शुभेच्छा दिल्या. घरोघरी भेट देऊन शुभेच्छा देण्यात येत होत्या. याशिवाय कब्रस्तानमध्ये जाऊनही नमाज अदा केली. ईदनिमित्त शिरखुर्मा, शेवय्यांचा आस्वाद घेण्यासाठी खास आग्रह करण्यात येत होता.बच्चे कंपनीमध्ये छोटे रोजेदारांचे तर सर्वत्र कौतुक करण्यात येत होते. त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वधर्मसमभावानुसार विविध धर्मीय बांधवांकडूनही प्रत्यक्ष, फोन, एसएमएस, व्हॉटस्अपव्दारे शुभेच्छा देण्यात येत होत्या. ईदसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मशीद परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)जिल्हाभर आज (मंगळवार) रमजान ईद जल्लोषात साजरी करण्यात आली. विशेष नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना गळाभेट करीत शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने दफनभूमीत कबरींची साफसफार्ई करून नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त आपल्या पूर्वजांना फुलांची चादर अर्पण करण्यात आली. आज सर्वत्र यानिमित्त प्रार्थनास्थळांवर गर्दी उसळली होती. आपल्या पूर्वजांची स्मृती जागवत मुस्लिम बांधवांनी मनोभावे प्रार्थना केली. आजच्या दिवशी छोटे रोजेदारांचे कौतुक करण्यात येत होते. ठिकठिकाणी बच्चे कंपनीही प्रार्थना करण्यात मग्न झाली होती. पहाटेचा फजर ( नमाज) व त्यानंतरची गळाभेट हा विलक्षण आदराचा, श्रध्देचा विषय ठरला.
रत्नागिरीत रमजान ईद उत्साहात साजरी
By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST