रत्नागिरी : पावस मार्गावरील गोळप सडा येथे अरबी मदरसा बंद करून ‘मजलीस फलाय ए दारेन’ या संस्थेतर्फे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. काळाची गरज ओळखून संस्थेतर्फे विधायक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असून या कोरोना केअर सेंटरला शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्वप्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
‘मजलीस फलाय ए दारेन’ या संस्थेतर्फे गोळप सडा येथे सुरू करण्यात आले आहे़ गोळप सडा येथे सुरू झालेल्या पावस कोरोना सेंटरमुळे पावस, गोळप, गावखडी, पूर्णगड, कसोप, गणेश गुळे, फणसोप पंचक्रोशीतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे़ पावस कोरोना केअर सेंटरचे उदघाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, बबिता कमलापुरकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तूझा उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकार कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगून शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. रत्नागिरी येथे लवकरच ऊर्दू भवन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. खासदार विनायक राऊत यांनी प्रत्येक नागरिकांनी कोरोनाकाळात काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कोरोना केंद्रात रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘मजलीस फलाय ए दारेन’ या संस्थेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप, ज्येष्ठ पत्रकार अलिमियाॅ काझी, मन्सूर काजी, रफिक बिजापुरी एजाज खान, शफी काझी, मुद्दस्सर मुकादम, मौलाना शकूर खान, पोलीस निरीक्षक गावीत, तहसीलदार शशिकांत जाधव, शौकत काझी, रहिम अकबर अली उपस्थित होते.
-------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा येथील पावस कोरोना सेंटरचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, बबिता कमलापूरकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित हाेते़