चिपळूण : वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सोमवारी सायंकाळी ४ वाजता जाेरदार पावसाने हजेरी लावली. पेरणीची कामे सुरू झालेली असतानाच पाऊस पडल्याने येथील शेतकरी सुखावून गेला आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात गेले काही दिवस पावसाचा अधुनमधून शिडकावा सुरू आहे. सोमवारी सकाळी कडकडीत ऊन आणि स्वच्छ वातावरण असताना सायंकाळी अचानक वातावरण बदलले. काळाकुट्ट अंधार करत प्रथम वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूने विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचे धुमशान सुरू होते. काही ठिकाणी पाणी साचले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी माती काढण्यात आली आहे. त्या मातीवर पाऊस पडल्याने चिखल होऊन रस्त्यावर आला होता. वारा आणि पाऊस जोरदार सुरू असल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.