राजापूर : मागील काही दिवसांपासून डाळींचे दर गगनाला भिडल्यामुळे समस्त हॉटेल व्यावसायिक हवालदील झाले आहेत. डाळीचे दर वाढल्याने डाळीच्या पदार्थांचे दरदेखील हॉटेल व्यावसायिकांनी वाढवले आहेत.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर डाळीचे दर वाढल्याने महिलावर्गदेखील हवालदिल झाले आहेत. यापूर्वी कांद्याचे दर प्रचंड वाढले होते. त्यावेळी अनेक हॉटेलमधून कांदा गायब झाला होता. कांदाभजी तर हॉटेलमधून गायबच झाली होती. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याऐवजी मुळा किंंवा कोबीच्या फोडी दिल्या होत्या. त्यानंतर आता तर जेवणातील महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या विविध प्रकारच्या डाळींचे दर भरमसाठ वाढल्याने दररोजच्या जेवणातील डाळींच्या पदार्थाची चांगलीच अडचण झाली आहे. यामध्ये तुरडाळ, मसूर, मूग या डाळींचाही त्यामध्ये सामावेश आहे. अशा महागड्या डाळी वापरून दररोजच्या जेवणात विविध प्रकारचे मेनू देणे हॉटेल व्यावसायिकांनाच जड झाले आहे. परिणामी नित्याच्या जेवणातील डालफ्राय, डालतडका, डालरोटी, डालखिचडी, वरण किंंवा डाळीची आमटी ग्राहकांना देणे न परवडणारे झाले आहे. त्यामुळे त्या डिशेसच्या किंमतीही हॉटेल व्यावसायिकांनी भरमसाठ वाढविल्या आहेत. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तर डाळीच्या पदार्थांना पर्याय म्हणून अन्य मेनू देण्याचा निर्णय घेताना तशी सुरुवातही केल्याचे दिसत आहे. मागील अनेक वर्षात डाळींचे दर आजएवढे कधीच वाढले नव्हते. साधारणत: सव्वाशे ते दीडशेच्या घरात पोहोचलल्या डाळी नंतर कमी होत असत मात्र मागील काही दिवसात तर डाळींनी दोनशेचा टप्पा गाठला आहे व ही बाब समस्त ग्राहकांना डोकेदुखी ठरली आहे. (प्रतिनिधी)
डाळीच्या दराचा व्यावसायिकांना तडका
By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST