फोटो मजकूर
अलिबाग येथील मच्छिमार सोसायटीला रंगीत जिवंत मासे वाहतूक करण्यासाठी डॉ. प्रकाश शिनगारे, डाॅ. संतोष मेतर यांच्याहस्ते पेट्या प्रदान करण्यात आल्या.
फोटो मजकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य विद्याशाखाअंतर्गत शहरातील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने अलिबाग (जि. रायगड) येथील मच्छिमार सोसायटीत मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिवंत सागरी रंगीत मासे वाहतूक करण्याकरिता विकसित केलेल्या पेटीबाबत प्रात्यक्षिक कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आऊट ऑफ बॉक्स नॉव्हेल रिसर्च प्रोजेक्टअंतर्गत ‘जिवंत सागरी रंगीत मासे वाहतूक साधन रेखाटन व विकसन’ या प्रकल्पातून संशोधनाअंती ही विशेष वाहतूक पेटी तयार केली आहे. अलिबाग मच्छिमार संस्थेच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेचा लाभ रायगड जिल्ह्यातील सुमारे ३० मच्छिमारांनी घेतला. दोन प्रकारच्या पेट्या या सोसायटीला सुपूर्त करण्यात आल्या.
उद्घाटनप्रसंगी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश शिनगारे यांनी, विद्यापीठाच्या या वाहतूक पेटीचा वापर केल्यास स्थानिक रंगीत जिवंत माशांची मोठ्या शहरांमध्ये विक्री होऊन अधिक उत्पन्न मिळेल. नजीकच्या काळात मुंबई व रायगड जिल्ह्यात नवीन होणाऱ्या सागरी मत्स्यालयाला जिवंत सागरी रंगीत मासे पुरवू शकतील, असे सांगितले.
रायगड जिल्हा संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी, मच्छिमार या वाहतूक पेट्यांचा वापर करून मत्स्य दुष्काळाच्या संकटात आपला आर्थिक विकास करतील, अशी आशा व्यक्त केली. अलिबाग मच्छिमार संस्थेचे उपाध्यक्ष सत्यजित पेरेकर यांनी, या पेटींचा उपयोग संस्था नक्की करेल व अहवाल आपल्या संस्थेला देईल, असे आश्वासन दिले.
डॉ. संतोष मेतर, प्रकल्प प्रमुख व प्रा. नरेंद्र चोगले यांनी वाहतूक पेटी वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त सुरेश भारती, तसेच डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्रा. चोगले, सहायक संशोधन अधिकारी, डॉ. संतोष मेतर, अभिरक्षक कल्पेश शिंदे, सहायक संशोधन अधिकारी वर्षा सदावर्ते, जीवशास्त्रज्ञ मनीष शिंदे, मत्स्यालय यात्रिक सचिन पावसकर, लिपिक मंगेश नादगावकर, महेश किल्लेकर, दिनेश कुबल, मुकुंद देऊरकर, वाहनचालक यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सहायक मत्स्य विकास अधिकारी व्ही. एच. सावंत, स्वप्नील दाबाणे, गणेश टेमकर, स्वरूप नांदोसकर, चेतन निवळकर व तुषार वाळूंज उपस्थित होते.