राजापूर : एखाद्या राज्यव्यापी विषयाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे किती गंभीर आहेत, हे त्यांनी राजापूरच्या मनसे तालुकाध्यक्षांविरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे पुढे आले आहे. पक्षाध्यक्षांनी रिफायनरीच्या अभ्यासाअंती केलेल्या समर्थनाला थेट आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्या मनसे तालुकाध्यक्षांच्या निलंबनामुळे, मनसेमध्ये चुकीला माफी नाही, हे सिध्द झाले आहे, अशी प्रतिक्रिया रिफायनरी समर्थक समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी व्यक्त केली आहे.
देश आणि राज्याच्यादृष्टीने राजापूर तालुक्यात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प बाहेर जाता कामा नये, अशा आशयाचे निवेदन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. रिफायनरीला राज ठाकरे यांनी उघड समर्थन केल्यानंतर प्रकल्प समर्थकांना हत्तीचे बळ मिळाले होते. रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपनंतर राज ठाकरे यांनीच अभ्यास करून प्रकल्पाला आपला हिरवा कंदील दर्शवला होता. ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार तसेच रत्नागिरीतील प्रकल्पसमर्थक शिखर समिती फार्डच्या सदस्यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
दरम्यान, मनसेचे राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देत, रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे ठामपणे कायम असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच मनसेच्या मुख्य कार्यालयातून तडकाफडकी तालुकाध्यक्ष राजेश पवार यांचे निलंबन करण्यात आले. समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. सुतार यांनी कारवाईच्या या घडामोडीवर भाष्य करताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.
रिफायनरीबाबत शिवसेना हा पक्ष काही मंडळींना हाताशी धरून वारंवार गैरसमज निर्माण करण्याचे कारस्थान करीत आहे. स्थानिक नागरिकांनी दर जाहीर झालेला नसतानाही तब्बल साडेआठ हजार एकर जमीन देण्याची लेखी तयारी दर्शवली आहे. या समर्थकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांच्या पाठीशी राजापूर तालुका नक्कीच उभा राहील, असा दावा ॲड. सुतार यांनी केला.