राजापूर : खाजणात चिपीच्या झाडाच्या आडोशाला हाभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर नाटे सागरी सुरक्षा पोलिसांनी छापा टाकला. संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना हातभट्टी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
पुलाचा प्रश्न मार्गी
देवरुख : देवरुख मार्लेश्वर मार्गालगत असलेल्या निवधे गावातील ग्रामस्थांना साध्या लोखंडी साकवावर ये-जा करावी लागते. या पुलासाठी चार कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
सिद्धी नार्वेकरचे यश
रत्नागिरी : सिंधुदुर्ग येथील दर्पण प्रबोधिनीतर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयीन गटात येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी नार्वेकर हिने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे.
उपोषणाचा इशारा
दापोली : तालुक्यातील आगरवायंगणी ते उजगाव मार्ग खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा १ मे पासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दयनीय अवस्था असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कोविड सेंटर निर्जंतुकीकरण
देवरुख : येथील स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली व देवरुख ग्रामपंचायतीच्या सहकार्याने देवरुख हायस्कूल, आंबेडकर वसतिगृह व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून दोन्ही इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
वाड्या संवेदनशील
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावातील जाधववाडी, भिडेवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या वाड्यातील प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, कोरोना तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत.
युवा संघटनेची बांधीलकी
रत्नागिरी : येथील वैश्य युवा संघटनेने सामाजिक बांधीलकी जपत कोरोना रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत चहा-नाष्टा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज सकाळी चहा, नाष्टा नातेवाइकांना वितरित केला जात आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : तालुक्यातील डोर्ले, हर्चे रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक वर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला असून, रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना, वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये रस्ता वाहून जाऊन एस.टी. बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लसीकरणासाठी नोंदणी
रत्नागिरी : मे महिन्याच्या प्रारंभापासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास २८ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवस आधी नोंदणी होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला २४ तारखेपासून नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता सुधारित नियोजनानुसार लसीकरण होणार आहे.
अन्नधान्य वाटप
लांजा : येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीतर्फे कोरोना कालावधीत अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातल्या आतापर्यंत ५१० कीटचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी १२०० कीटचे वाटप करण्यात आले होते.