रहिम दलाल- रत्नागिरी -विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना शह आणि मतांची गोळाबेरीज यावर लक्ष केंद्रीत करूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर, तर सतीश शेवडे यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. मागील अडीच वर्षे शिवसेना-भाजपा युती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर होती. उपाध्यक्षपद आणि सर्व विषय समित्यांवर युतीचे सभापती होते. मात्र, अध्यक्षपद युतीकडे नसल्याची खंत सर्वच शिवसेना - भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनाला टोचत होती. मात्र, रविवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत युतीने संपूर्ण जिल्हा परिषदेवर आता कब्जा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे. राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवार पाहिजे. ही मागणी निवडणुकीच्या तोंडावर वाढू लागली होती. कधी नव्हे ते पक्षांतर्गत स्पर्धक वाढू लागल्याने विद्यमान आमदार राजन साळवी यांना डोकेदुखी ठरु लागली होती. जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ता कदम यांनीही विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांना शांत करण्यासाठी जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक समोर आल्याने आमदार साळवी यांनी आपली ताकद दाखवण्यामध्ये कुठचीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यातच लांजा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासात एकदाही अध्यक्षपद लाभलेले नाही. चिपळूण आणि दापोली तालुक्यातील इच्छुक असताना अध्यक्षपदाची माळ माजी सभापती जगदीश राजापकर यांच्या गळ्यात पडली. याचे श्रेय आमदार साळवी यांना जात असले तरी त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. राजापकरांच्या निवडीने कदम यांना शह आणि कधी नव्हे ते लांजा तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्याने येथील विकासाला आणखी चालना मिळणार असल्याने जनतेचा विश्वास त्या माध्यमातून संपादन येणार आहे.माजी आमदार बाळ माने यांचा मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पाडाव झाला. मात्र, यावेळी त्यांनी सावध भूमिका घेत कोणत्याही समाजाला दुखावून चालणार नाही, याचा विचार करुनच त्यांनी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती आणि आपले विश्वासू सहकारी सतीश शेवडे यांना उपाध्यक्ष पदावर बसवले. तसेच भाजपामध्ये अजूनही आपली ताकद किती आहे, ते पक्षांतर्गत विरोधकांना शेवडे यांच्या निवडीने माजी आमदार माने यांनी दाखवून दिले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही आपल्या पथ्यावर कशी पडेल, हे गणित समोर ठेवूनच निवड करण्यात आली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीला विधानसभेची किनार
By admin | Updated: September 23, 2014 00:13 IST