देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जंगलमय भागात एका अनोळखी प्राैढाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी घडली आहे.
याबाबत आरवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम लांबे यांनी माहिती दिली आहे. आरवलीतील ग्रमस्थ कामानिमित्त जात असताना शनिवारी सकाळी आरवलीतील जंगलमय भागात एक मृतदेह दिसला. ग्रामस्थांनी याबाबत पोलीस पाटील दत्ताराम लांबे यांना सांगितले. लांबे यांनी पाेलिसांना माहिती दिल्यानंतर, पाेलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाजवळ ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने ओळख पटलेली नाही. हा मृतदेह अंदाजे ४० ते ४५ वर्षांच्या पुरुषाचा आहे. हा प्राैढ गेले काही दिवस खेरशेत, शिंदे आंबेरी या परिसरात वेडसर स्थितीत फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. चक्कर येऊन पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल प्रशांत शिंदे करीत आहेत.