रत्नागिरी : वीज कामगार, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे गेले सहा दिवस वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, वीज कामगार व कुटुंबीयांचे लसीकरण करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांकडे वीज कामगारांनी लक्ष केंद्रित केले होते. मात्र, ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
मृत वीज कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान द्यावे व मेडिक्लेम योजनेत नेमलेला नवीन टीपीए रद्द करून कोविड-१९चा प्रभाव पाहता वीज बिल वसुलीसाठी सक्ती करू नये, आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन सुरू असताना कोणत्याही वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, झाला तरी तत्काळ पूर्ववत करण्याची काळजी घेण्यात आली होती. सुरुवातीला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमवेत चर्चा असफल झाल्याने कामबंद आंदोलन सुरू होते. ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, तसेच तिन्ही कंपनींचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इतर अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त सभेत सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात आला नाही तर मात्र सामुदायिक रजा आंदोलनाचा इशारा कृती संघटनेने दिला आहे.