रत्नागिरी : जिल्हा बॅँक कर्मचारी वेतनवाढ कराराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आज, गुरूवारी एकमेकांवर जोरदार टोलेबाजी केली. बोलायची संधी मिळालेल्या प्रत्येक नेत्याने एकमेकांना चिमटे काढल्याने चांगलाच कलगीतुरा रंगला. नेत्यांच्या हजरजबाबीपणामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मात्र हास्याचे फवारे उडाले.जिल्हा बॅकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात राजकीय फटकेबाजी रंगली. ऐन विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं हे राजकीय क्रिकेट अनेकांनी हसत हसत अनुभवलं. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. तानाजी चोरगे यांनी जोरदार आतषबाजी करत आमदार उदय सामंत, बाळ माने, यांच्यासह संयोजकांचीच विकेट काढली. सत्काराच्या निमित्ताने उभ्या केलेल्या स्वागत कमानीवर आमच्या फोटोवर भगवा झेंडा लावल्याने मोठीच पंचायत झाली, मात्र आज शिवजयंती असल्यामुळे कोणाच्या मनात शंका येऊ नये, असे सांगत कार्यक्रमावर असलेल्या शिवसेनेच्या प्रभावावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.आमदार उदय सामंत यांची विकेट काढताना ते म्हणाले, गेल्यावेळी तुम्ही वेगळया पक्षात होतात, त्यावेळी तुमचे सरकार होते, आता नवीन सरकार आहे, पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, तर पुढच्यावेळी दुसरेच सरकार असेल, पण तुम्ही त्या सरकारमध्ये असाल असे सांगत सामंत यांच्या पक्षांतरावर चिमटा काढला. सामंत यांना चिमटा काढताना माजी आमदार बाळ माने यांना राग आला असेल, असे सांगून त्यांचीही कोंडी केली. यावेळी त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याही फिरक्या घेतल्या.सुरूवातीला मनोगत व्यक्त करताना आमदार उदय सामंत यांनीही फटकेबाजी करताना जिल्हा बँकेने आमच्यासारख्या राजकीय लोकांना कर्ज दिले पाहिजे, असे सांगितले. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले, आपलीही पतपेढी असून लोकांना संस्थेने कर्ज दिले नाही, तर जाब विचारत आम्ही तुमचे मतदार आहोत, आम्हाला कर्ज दिले पाहिजे असे सांगतात. कर्ज दिल्यावर निवडणुकीवेळी आमचे कर्ज तुम्हीच फेडा नाहीतर मतदान करणार नाही, असे सांगतात, त्यामुळे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांची सहकारी संस्था चालवताना गोची होत असल्याचे सांगितले.एकाच व्यासपीठावर उपस्थित असूनही, एकामेकांकडे न पाहणाऱ्या रत्नागिरीच्या आजी-माजी आमदारांनी भाषणात एकमेकांची नावे घेत आमचे मित्र असा उल्लेख केला. मात्र, दोघेही एकमेकांच्या भाषणावेळी मोबाईलशी चाळे करत होते. माजी आमदार बाळ माने यांनी तर आपल्या भाषणात भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र आल्याने आमदार सामंत आणि आपण एकत्र आलो असून, आमच्यात आता कोेणताही वाद होणार नसल्याचे सांगून षटकारच ठोकला. पण त्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामंत आता आमच्यातच आहेत. त्यामुुळे आता एकत्रच काम करायचे आहे. बॅँक निवडणूक बिनविरोध होण्यात काही अडचण नाही, असाही शेरा माजी आमदार बाळ माने यांनी मारला.नेत्यांच्या या टोलेबाजीला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटांनी दाद दिली. टाळ्यांचा कडकडाटामुळे सावरकर नाट्यगृह अक्षरश: दणाणून गेले. सुरूवातीपासून शेवटपर्यंत रंगलेल्या या मैफलितील हे राजकीय चौकार, षटकार चर्चेचा विषय ठरला आहे. हा आनंद शेकडो प्रेक्षकांनी लुटला. (प्रतिनिधी)
सत्कार सोहळ्यात राजकीय टोलेबाजीचे पुष्पहार
By admin | Updated: February 19, 2015 23:46 IST