रत्नागिरी : कोरोना रुग्णांवरील उपचारात ऑक्सिजनचा पुरवठा महत्त्वपूर्ण असल्याने, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये २,६२८ बेडपैकी २,०११ बेड्सना ऑक्सिजनची सुविधा नाही. सद्यस्थितीत ऑक्सिजन सुविधा असलेले ६१७ बेड आहेत. त्यामुळे अशा बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्सिजन तयार करणारा प्लँट जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजून खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याइतकी स्थिती रत्नागिरीमध्ये आलेली नाही, असेही ते म्हणाले.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाने कहर केला होता. तेव्हा रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले होते. आता कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची गरज लागल्यास समस्या निर्माण होऊ नये, यासाठी रुग्णालयात प्लँट उभारण्याची तयारी करण्यात आली आहे.