लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी लागलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी या कालावधीत महिलांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला असून २०१९ च्या तुलतेन २०२० मधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटले आहे. अत्याचाराचे प्रमाण कमी झाले असले तरी झालेल्या प्रकारांमधील बहुतांश घटना या त्या पीडितेच्या परिचितांकडूनच झाल्या आहेत.
महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार हे त्यांच्या आसपासच्या, ओळखीच्या लोकांकडूनच केले जात असल्याचा गंभीर प्रकार गेल्या काही वर्षात पुढे आला आहे. परिचय असल्याचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यातही कमी नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे कमी नाहीत. गेल्या काही वर्षात वाढ झालेली दिसून येते. सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अत्याचाराचे ४८ गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल झाले. त्यात ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील ५७ जण पीडित महिलेचे परिचित होते. याचवर्षी विनयभंगाचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये १२६ जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. यातील १२५ संशयित हे पीडितांच्या परिचयाचे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सन २०१९ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक केल्याचे १८ गुन्हे दाखल झाले आहेत, तर हुंडाबळीचा १ गुन्हा खेड पोलीस स्थानकात दाखल आहे.
सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून लाॅकडाऊनला सुरुवात झाली आणि अवघे जग कोरोनाचा चक्रात अडकून गेले. माणसे आपापल्या घरात बंद झाली. यामुळे महिलांवरील अत्याचार पूर्णपणे कमी होतील ही अपेक्षा जरी फोल ठरली असली तरीही मात्र त्यात घट झालेली दिसून येते. गतवर्षी महिला अत्याचाराचे जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये ३८ गुन्हे दाखल होऊन यामध्ये ४८ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ४८ पैकी महिलांवर अत्याचार केल्याचा संशय असलेले ४४ जण परिचित आहेत. २०२० मध्ये विनयभंगाचे १७८ जणांवर ७३ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील १७७ जण हे पीडितांच्या परिचयाच्या असल्याचे उघड झाले आहे. गतवर्षी लग्नाचे आमिष दाखवून जिल्ह्यात ९ गुन्हे दाखल झाल्या असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.