खेड : तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर गावच्या धनगरवाडीला पुन्हा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या पाणीटंचाईनंतर जून महिन्यामध्ये मुसळधार झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपल्याचे वाटत होते. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने येथे पुन्हा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येथील धनगरवाडीला पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे अंतर २० किलोमीटर इतके आहे. धनगरवाडीवगळता या डोंगरावर कोणतीही वस्ती नाही. खेड, दापोली, मंंडणगड आणि पोलादपूर या चार तालुक्यांच्या सीमेवर डोंगरदऱ्यामध्ये ही वाडी वसली आहे. वर्षोनुवर्षे ही वाडी दुर्लक्षित राहिली आहे. सातत्याने येथे पाणीटंचाई असते.गावाकडे जाण्यासाठी डोंगर असल्याने आणि रस्तादेखील चांगला नसल्याने प्रशासनाचा पाण्याचा टँकरदेखील या वाडीत जात नाही. एस. टी. सुविधादेखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यांपैकी धनगर समाजाची ही वस्ती आहे. मोजून या वाडीमध्ये १० घरे आहेत. दुग्ध व्यवसाय हाच या लोकांचा जगण्याचा मोठा आधार आहे. शिक्षणाचे जवळपास साधन नाही. ५ किलोमीटरची पायपीट करीत येथील मुलांना तुळशी येथील शाळेत जावे लागते. येथील लोकांना गावाजवळ कोणताही जलस्रोत नसल्याने तेथून बरेच अंतर कापून जामगे गावातील विहिरीतून पाणी आणावे लागते.धनगरवाडीतील एकाच घरामध्ये रिक्षा आहे़ अन्य लोकांकडे कोणतेही साधन नाही़ लोकांची पायपीट सध्या प्रशासनालादेखील पहावेनाशी झाली आहे. विंधन विहिरी पाडण्यासाठी वाहन या वस्तीमध्ये जात नसल्याने तीही सोय करू शकत नसल्याची खंत प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र, असे असूनदेखील धनगरवाडीतील या लोकांना पाण्यावाचून तडफडावे लागत असल्याने प्रशासनाने यातून काहीतरी मार्ग काढावा. येथील जनतेची पाण्यावाचून होणारी तडफड थांबवावी, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन सातबाराचा घोळ
By admin | Updated: July 16, 2015 22:53 IST