फुलांचा खप
रत्नागिरी : गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. सध्या कोरोनामुळे शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत असला, तरी पालखीसाठी फुले, वेण्या, हार, फुलांच्या चादरी भाविकांकडून अर्पण केल्या जात आहेत. शिवाय लग्नसराईमुळे वेण्या, हार, तुरे, पट्टाशिवाय वाहन, तसेच समारंभ स्थळी फुलांची सजावट करण्यात येत असल्याने फुलांना वाढती मागणी आहे. कोरोनामुळे फुलविक्रेते फोनवरून ऑर्डर घेत असून, ग्राहकांना घरपोच सुविधा उपलब्ध करीत आहेत.
रस्ते दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील आरेवारे गणपतीपुळे मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. गतवर्षी लाॅकडाऊनपूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, वाहनाच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डे उखडले असून, खड्ड्यातून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी वाहन चालकांमधून करण्यात येत आहे.
पालकांमध्ये संभ्रम
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर असून, शासनाने ऑफलाइन परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पालक मात्र धास्तावले असून, मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडणे, आणणे, तसेच मुलांच्या आरोग्य सुरक्षेबाबतचा प्रश्न निर्माण झाल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
शेतकरी चिंताग्रस्त
रत्नागिरी : हवामान खात्याने दि.११ व १२ रोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाला आहे. या वर्षी ऋतुमानातील बदलामुळे आधीच आंबापीक धोक्यात असताना, पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडावरील आंबा पिकाबाबत चिंता निर्माण झाली आहे.