खेड : खेड-दापोली मार्गावरील चिंचघर-वेताळवाडी येथे दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात मुंबई पोलीस दलातील हवालदार शिवराम सुरेश नाईक (वय ४०, मूळ कारवार) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेले मुकेश ठाकूर (शिरगाव, चिपळूण) यांना उपचारासाठी कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हवालदार नाईक सुटीवर आपला मित्र मुकेश ठाकूर यांच्याकडे आले होते. शनिवारी सकाळी ते आपल्या नव्या कोऱ्या दुचाकीवरून (एमएच-०८-टीसी-३७३) मुकेशसह दापोलीकडे जात होते. ते चिंचघर - वेताळवाडी येथे आले असता हवालदार नाईक यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात नाईक यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर ठाकूर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी विच्छेदन करून नाईक यांचा मृतदेह रात्री उशिरा त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)
दुचाकी झाडावर आदळून एक ठार
By admin | Updated: March 29, 2015 01:04 IST