आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलची पालक सभा पोषण आहार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चांगलीच वाजली. शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षण विभागाचा प्रतिनिधी आणि संस्थाचालक यांच्या उपस्थितीशिवाय पोषण आहाराबाबत निर्णय घेण्यास ग्रामस्थांनी असहमती दर्शवल्याने ही सभा संपवण्यात आली.भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहाराचा तांदूळ मुख्याध्यापकाने परस्पर विकल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली. त्यानंतर मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महिना उलटून गेला तरीही मुख्याध्यापकास अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. या सर्व घडामोडीत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे विद्यार्थी आजतागायत पोषण आहारापासून वंचित आहेत.याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोषण आहार चालू करण्याबाबतचे पत्र पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळेला देण्यात आले. याबरोबरच ही योजना बचत गटामार्फत चालवण्यात यावी, अशी सूचनाही देण्यात आली.पोषण आहार सुरु करण्यासाठी पालकांची एक विशेष सभा लावण्यात आली. या सभेला शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. प्रत्यक्षात या सभेला प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचा प्रतिनिधी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केंद्रप्रमुख साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता वरिष्ठांच्या आदेशाशिवाय आपण सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मात्र ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.पोषण आहाराची झालेली अफरातफर ही बाब गंभीर आहे. मात्र, प्रशासनाने केलेले दुर्लक्ष ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया सभेमधून व्यक्त करण्यात आली. या घटनेचा जाहीर निषेधही करण्यात आला.पोषण आहाराचे नियोजन करण्यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी व नियोजन करण्यासाठी ग्रामस्थांची एक विशेष सभा तातडीने लावण्यात यावी. या सभेला शिक्षण विभागाचा जबाबदार प्रतिनिधी, प्रभारी मुख्याध्यापक तसेच संस्थेचे सर्व संचालक उपस्थित असावेत, असा ठरावही करण्यात आला. गैरहजर संचालकांनी आपले राजीनामे सादर करावेत अन्यथा ग्रामस्थांनी त्यांचे राजीनामे घ्यावेत, असे ठरावही या सभेत करण्यात आले. (वार्ताहर)
पोषण आहार भ्रष्टाचारावर सभा वादळी
By admin | Updated: August 1, 2014 23:26 IST