संकेत गोयथळेगुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील राज्य संरक्षित स्मारक झालेला गोपाळगड अजूनही खासगी मालकीच्या वादात अडकला आहे. हा गडसरकारच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, गडाच्या आतील भागात केलेले बांधकाम काढून टाकण्याबाबत सुफिया युनूस मण्यार व कादिर हुसेन मण्यार यांना पुरातत्त्व विभागाने नोटीस बजावली आहे.समुद्री मार्गाने होणारे आक्रमण रोखण्याबरोबरच समोरील दाभोळ बंदरावर होणाऱ्या सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी अंजनवेल समुद्रकिनारी गोपाळगड बांधण्यात आला होता. मात्र, सरकारी अनास्थेमुळे केवळ तीनशे रुपयाला हा किल्ला विकला गेल्याने खासगी मालकीच्या ताब्यात आहे. गोपाळगडावरील तटबंदी तोडून व खंदकात भराव टाकून अनधिकृतपणे रस्ता करण्यात आला आहे. तसेच गडाच्या आतील भागात अनधिकृतपणे बांधकाम करून पर्यटकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत.याबाबत दुर्गप्रेमी, विविध दुर्गप्रेमी सामाजिक संघटनांनी आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. त्याचबराेबर येथील स्थानिक रहिवासी दीपक वैद्य यांनी सर्व दस्तावेज गाेळा करून या गडाची खासगी मालकीतून सुटका हाेण्यासाठी लढा सुरू केला. त्यांना अक्षय पवार यांनीही साथ दिली. तसेच शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. संकेत साळवी यांनीही गोपाळगड संरक्षित हाेण्याबाबत जनजागृती केली.दरम्यान, गाेपाळगड खासगी मालकीच्या तावडीतून सरकारच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गडावर केलेली अनधिकृत बांधकामे ताेडण्याबाबत पुरातत्त्व विभागाने नाेटीस बजावली आहे. पुरातत्त्व विभागाने १९६१ च्या महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम व शासन परिपत्रकानुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
गोपाळगडाबाबत स्थानिक पातळीवर अनधिकृत बांधकाम व खासगी मालकी काढून शासनाने हा किल्ला ताब्यात घेण्याबाबत पत्रव्यवहार करत आहोत. पुरातत्त्व विभागाने इच्छाशक्ती बाळगल्यास हा किल्ला खासगी मालकीतून मुक्त होऊ शकतो. याबाबत आपण कोणतीही न्यायालयीन लढाई लढत नसून फक्त पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करत आहे. - दीपक वैद्य, रहिवासी, अंजनवेल.